आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहामध्ये साजरी.

LoktantraNews24

प्रतिनिधी:न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर विद्यालयामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की गुरुपौर्णिमा हा आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. या दिवशी गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद घेतले जातात.

याच दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता, ज्यांना हिंदू धर्मातील पहिले गुरु मानले जाते. त्यांनी वेदांचे संकलन केले आणि ज्ञान मानवापर्यंत पोहोचवले. यामुळे या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ असेही म्हणतात. भारतीय संस्कृतीत गुरुंना अत्यंत आदराचे स्थान आहे. गुरु हे शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात. गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुंप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो.

बौद्ध धर्मानुसार याच दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथ येथे आपले पहिले प्रवचन दिले होते, ज्यानंतर त्यांनी आपल्या पाच शिष्यांना ज्ञान दिले.जैन धर्मानुसार भगवान महावीरांनी याच दिवशी गौतम स्वामींना आपले पहिले शिष्य बनवून गुरु बनले होते.

गुरुपौर्णिमेला गुरुंची पूजा केली जाते, त्यांचे आशीर्वाद घेतले जातात आणि त्यांच्या शिकवणीचे स्मरण केले जाते. या दिवशी अनेक लोक उपवास करतात, प्रार्थना करतात आणि आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करतात. हा दिवस आपल्या जीवनात मार्गदर्शक असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, मग ते आपले शिक्षक असोत, पालक असोत किंवा घरातील वडीलधारी मंडळी असोत. विद्यालयातील विद्यार्थिनी शार्वी कोतवाल आणि सिद्धी कोतवाल या विद्यार्थिनी सर्व उपस्थितांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील उपशिक्षक चौरंगनाथ कामथे यांनी केले.

संपादक: सुखदेव भोरडे

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.