आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेरणे येथील राधाकृष्ण विद्यालयात तब्बल २७ वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा.

सन-१९९६-९७ इयत्ता दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात पडला संपन्न.

प्रतिनिधी:रविवार,तसा शाळेसाठी सुट्टीचा वार. परंतु पेरणे,ता-हवेली येथील राधाकृष्ण विद्यालयात मात्र या दिवशी दिवसभर माजी विद्यार्थ्यांची अनौपचारिक शाळा भरली.‌‌..हो..हो..शाळाचं !शाळेत विद्यार्थी होते वयाची चाळीशी पार केलेले.

राधाकृष्ण विद्यालयाच्या सन-१९९६-९७ च्या बॅचच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल २७ वर्षांनंतर सर्व विद्यार्थी व शिक्षक यांची स्नेहभेट झाली.रविवार असूनही शाळेच्या नेहमीच्या वेळेप्रमाणे विद्यार्थी शाळेत जमा झाले,सोबत शिक्षक हि उपस्थित झाले.मग काय! दिवसभर जुन्या आठवणी,गप्पा,गोष्टी-संवाद,गाणी,खेळ यातचं सर्वजण रममाण झाले होते.स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळी १० वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जवळपास ३५ जणांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.पेरणे गावच्या मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते आरती करुन सजवलेल्या बैलगाडी व D.J वर लावलेल्या सुमधुर संगितावर शिक्षकांची गावातून शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करुन गुरुजनांच्यावर फुलांची उधळण करण्यात आला.

पुढे शाळेच्या मुख्य गेटपासुन शाळेच्या प्रांगणापर्यंत दुतर्फा उभे राहून विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांचे फुलांच्या पायघड्या घालून व फुलांचा वर्षाव करुन स्वागत केले.या आगळ्यावेगळ्या स्वागताचे शिक्षक हि अक्षरशः भारावून गेले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सध्या आपल्यात हयात नसलेले- निधन पावलेले संस्थेचे शिक्षक,शिक्षकेत्तर सेवक,विद्यार्थी, सहकारी,त्याचबरोबरनापीकी, कर्जबाजारीपणा अथवा इतर काही कारणांमुळे आत्महत्या केलेले शेतकरी बांधव व देशाच्या संरक्षणासाठी सिमेवर शाहिद झालेल्या जवानांना सामूहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर राष्ट्रगीत घेण्यात आले.मुख्य सोहळ्या दरम्यान उपस्थित मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.२७ वर्षापुर्वी आपल्याला ज्ञानदान करणाऱ्या आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थित सर्व शिक्षकांचा शाल,श्रीफळ,पुस्तक पुष्पगुच्छ व कृतज्ञता सन्मान पत्र देऊन आदरपूर्वक सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी सन १९८७ ते १९९३ या कालावधीमध्ये पेरणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या केशर बिडकर-दरेकर बाई यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.बाईंनीही जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला.सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.राधा कृष्ण विद्यालयाचे सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक एम.डी.वाळके सर यांनी आत्ताच्या धावपळीच्या युगात कुटुंब व्यवस्थेत मुलांवरं योग्य संस्कार करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले.

“ज्यावेळी एखादा विद्यार्थी मला भेटतो व मी आता या पदावर कार्यरत आहे,असे म्हणतो त्यावेळी माझा उर अभिमानाने भरुन येतो.संस्थेत सेवेसाठी रूजू झालो त्यावेळी सुरुवातीला अगदी कमी पगार होता,अपार कष्ट केले,हाल सोसले,त्याची चांगली फळे आज पहायला मिळतात.विद्यार्थी,शाळा व गावकऱ्यांनी जे प्रेम दिले ते कायम स्मरणात राहिलं,असे भावनिक वक्तव्य राधाकृष्ण विद्यालयाचे विद्यमान मुख्याध्यापक रविंद्र नवले सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले कुटुंब,संस्था,विद्यालय,विद्यार्थी,सहकारी व ग्रामस्थ यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळे आम्ही सर्व सहकारी आज संस्थेच्या विविध ठिकाणी असलेल्या शाळांवर मुख्याध्यापक,प्राचार्य पदावर कार्यरत आहोत.अनेक जुने माजी विद्यार्थी आनंदाने भेटायला येतात,विद्यार्थ्यांच्या आनंदात, सुखातचं शिक्षकांचे सुख आहे असे भावनिक उद्गार हेमंत तांबे सर यांनी काढले.अनेक विद्यार्थी -विद्यार्थीनींही आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन गणेश सातव यांनी केले.दुपारच्या सत्रात स्नेह भोजना बरोबर,संगीत मनोरंजनाचा कार्यक्रम पार पाडला.पं.सुरेंद्र गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी जुन्या -नव्या सुमधुर गीताची मैफल सजवली होती.सोहळ्याच्या दरम्यान उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रविंद्र नवले सर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.साधारण शाळा सुटायच्या वेळी मुला-मुलींनी आपल्या शिक्षकांसोबत खो-खो खेळण्याचा आनंद लुटला.क्रिडांगणावर खो-खो खेळता खेळता विद्यार्थी शाळेच्या बालवयात हरवून गेले होते.

कार्यक्रम पार पाडण्यासाठी सोमनाथ जाधव,शशिकांत वाळके,दयानंद वाळके,दत्ता वाळके,रविंद्र वाळके,संदिप वाळके,सुरेश गायकवाड,ओमप्रकाश धर्माधिकारी,राजु गायकवाड,नवनाथ गायकवाड,जावेद सय्यद,विनोद वाघमारे,शिवराम कोळपे,उषा वाळके,संगिता गायकवाड,प्रमिला गायकवाड यांच्यासह सर्वचं माजी विद्यार्थ्यांंनी परिश्रम घेतले.आभारप्रदर्शन करुन पुनर्भेटीचे आश्वासन देऊन स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली.

संपादक: सुखदेव भोरडे

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.